Blog (Marathi)

पत्ता कट ….!!

मोहन टिळक
पुणे
दिनांक ०६ ऑक्टोबर २०२०

लहानपणापासून पत्ते हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक राहिलेला आहे. मला आठवते तेव्हा पासून सर्व उन्ह्याळ्याच्या व दिवाळीच्या सुट्ट्या मी पत्ते कॅरम , बद्धिबळ अश्या बैठ्या खेळांच्या जोरावर पचवल्या आहेत. त्यातल्या त्यात पत्त्यांना विशेष महत्व आहे कारण मोठे होताना लागणारे व्यवहारी शिक्षण खरेतर पत्त्यातून सुरु झाले. लहानपणी आमच्या घरी पत्ते खेळणाऱ्यांची बैठक बसत असे . त्यांच्या आजूबाजूला घोटाळत असताना , मला वाटते कि काऊचिऊ यांच्या अगोदर मला इस्पिक , चौकट कळू लागले असावे. पत्त्यांच्या जवळ मोठी मंडळी फिरकू देत नसत, मग मी त्यांची पाने फोडण्याच्या धमक्या देऊन “भिकार सावकार” चा एखादा डाव त्यांचे खेळणे संपल्यावर पदरात पडून घेऊ लागलो. पाहता पाहता “भिकार सावकार” सारख्या डावातून पत्त्यांशी माझा घनिष्ठ स्नेह कसा जुळला ते कळलेच नाही. आणि त्यानंतर मी मागे वळून पहिले नाही. सात-आठ , झब्बू अशी स्टेशने घेत परीक्षांनंतर च्या उन्ह्याळ्याच्या सुट्ट्या सर करत करत माझा पत्त्यांचा प्रवास सुरू राहिला . पुढे बदाम सात , रमी करत करत गाडी होस्टेलवर त्या तीन पानी पर्यंत कधी पोचली ते कळलेच नाही. आज जाणवते की अनेक प्रकारांच्या पत्त्यांच्या डावांनी आयुष्य खरे समृद्ध झाले आहे….

भिकार सावकार मध्ये सर्व काही नशिबावर .. पत्त्यांच्या कॅट मधून कोणचे पान येणार ते त्या भगवंतालाच ठाऊक. आयुष्यात कधी कधी तुमच्या प्रयत्नाला आणि पुरुषार्थाला शून्य किंमत असते , सारे काही नशिबाच्या हातात .. हा मिळालेला पहिला धडा माणसे आयुष्यात पुष्कळ वेळा विसरतात . तुम्ही एक्का असा कि दुर्री .. यात सर्व जण सारखेच , तुमचा गट , इस्पिक व चौकट हीच तुमची ओळख .. समूहामध्ये काम करताना हे कायम लक्षात ठेवावे हा धडा खूप शिकवून जातो .

क्षणात सावकार असलेला पुढच्या क्षणी एका उतारीत भिकारी होऊ शकतो हा हि धडा तितकाच महत्वाचा . भिकार सावकार खेळताना लबाडी करता येत नाही , निरागस अशा बालकांसाठीच हा पहिला खेळ आहे . त्यानंतर जसे पत्त्यांमधले उच्च नीच कळत जातात तशी तशी निरागसता हरवून जाते आणि मग सुरु होते ती चढाओढ – पत्त्यांच्या डावात आणि आयुष्यातही ..! त्यानंतर मग मन भिकार सावकार मध्ये रमत नाही. बदाम सात , रमी , झब्बू , अश्या चढत्या भाजणीने ब्रीज , तीन पानी पर्यंत सगळे पत्त्यांचे प्रकार आकर्षक वाटू लागतात आणि यातून मग कळत नकळत मनुष्यस्वभावाचे आणि व्यवहार ज्ञानाचे धडे मिळत जातात .

सात आठ असो की पाच तीन दोन , खरी मजा असते ती हात ओढण्याची. हात ओढूदेताना आपल्या पानातील जड पाने वाचवण्याचे कसब महत्वाचे.मात्र तरीही मागच्या डावातले कर्माचं फळ या डावात चुकवावे लागतेच हे हि विधीलिखित . दुसऱ्याचे हात ओढण्यात मिळणारा आसुरी आनंद मग सुखावून टाकू लागतो आणि या ओढाताणीत तयार झालेले बंडखोर व्यवहारी मन पत्त्यातले हात ओढता ओढता दुसऱ्याचे पाय ओढायला कधी शिकते ते कळतच नाही.

नवा गडी नवा डाव असा खेळ सुरु राहतो . नव्या डावात पाने वाटली की ‘मेड फॉर इच आदर ‘ राजाराणीची ताटातूट ठरलेलीच . एका रंगाचे राजाराणी एकत्र येणे हे मोठे भाग्य कधी कधीच मिळते, अन्यथा विजोड जोडी किंवा एकलेपणा राजा राणीच्या भाग्यात लिहीलेला …. नाही म्हणता कधी अचानक त्यांचे मीलन होते .. मात्र ते अवलंबून असते एक्क्याच्या उतारीवर आणि तेही क्षणभंगूर . हीच नियती आहे.

अनेक वर्षे रोज तेच ते डाव ,रमी वा बदाम सात खेळणाऱ्यांची निष्ठा पत्त्यांवर नाही तर पत्त्यांबरोबर चालणाऱ्या गप्पा आणि चहा फराळावर. ज्यांनी पत्त्यांचे देशोदेशीचे डाव आत्मसात केले ते खरे रसिक. थोडक्यात काय कि ” मेंढी कोट” ,” पपलू ” , “वेल कट ” हे शब्द कळणारा खरा दर्दी .

पत्त्यांचा डाव म्हणजे कूट कारस्थानाचे बाळकडूच .. म्हणूनच कंदाचीत माझी आजी ” अरे काय दिवस रात्रभर पत्ते कुटत बसलाय” असे म्हणत असावी … दुसऱ्याची पाने मोक्याच्या वेळी कशी अडवावीत , पार्टनर बरोबर खुणा अथवा नेत्रपल्लवी करून कुणाच्या नकळत माहितीची देवाण घेवाण कशी करावी , गनिमी काव्याने बदाम सात मध्ये सत्ती कशी दडवून ठेवावी अशा असंख्य डावपेचांचे बालशिक्षण पुढे आयुष्यात खूप उपयोगी ठरते.

खरे म्हणजे सगळ्या मुलांना पत्त्यांचे डाव शिक्षणात असले पाहिजेत असे मला वाटते.. आजच्या व्यवहारात त्याचा खूप मोठा उपयोग आहे… कोणते पान खेळायचं त्या पेक्षा खेळायचं नाही हे जास्त महत्वाचे. पत्त्याच्या डावात कॅट मधलेच कार्ड खेळावे लागते. एकदा का कोणते कार्ड खेळायचे , कधी खेळायचे कळले की मग आयुष्याचे मैदान मोकळे होते. इतकेंच काय , नवनवी कार्ड्स बनवण्याचे कौशल्य पण काही लोक प्राप्त करतात . याची काही उदाहरणे पाहू:

प्रसंग असा आहे – चितळें यांच्या दुकानाबाहेर रांग आहे . रांगेत असलेल्या एका माणसाचा मित्र दुरून येतो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागतो. गप्पात अगदी बुडून जातो . रांग पुढें सरकूलागते आणि मित्राबरोबर हा पण पुढे सरकू लागतो. त्याचा मनसुबा बरोब्बर ओळखून मागचा एक त्याच्याशी बोलू लागतो आणि दोघे आपआपली कार्ड्स खेळू लागतात.

प्रथम संवाद पाहू:

“अहो रांग तिकडे मागून सुरु आहे .. तुम्हाला लक्षात आले नसेल म्हणून म्हटले सांगावं “
“हो का? मला वाटलं कि इथूनच आहे ..
-तसे मला बाकरवाडीचे एकाच पाकीट घ्यायचे आहे .. नो प्रॉब्लेम .. हा घेईल माझ्यासाठी “
“अहो इथे सगळ्यांनाच एक पाकीट हवे आहे बाकरवाडीचे .. मागे रांगेत अनेक वयस्क उभे आहेत त्यांच्यावर हा अन्याय नाही का? “
“ठीक आहे .. मी थांबतो बाहेर ( असे म्हणत मित्राला सूचक इशारा) “
” तुमचे मित्र सुशिक्षित दिसतात .. मला खात्री आहे ते रांग मोडून तुमच्यासाठी बाकरवाडीचे पाकीट घेणार नाहीत “
” अहो तश्या मला नकोच आहेत .. चितळ्यांच्या बाकरवड्या बिग बास्केट ने घरी पण मागवता येतात .. सहज हा भेटला म्हणून म्हटले घ्याव्यात “
” नाही , म्हणजे बिग बास्केट वर शिळ्या मिळतात ना.. काहींना चालतात त्यांनी अवश्य घ्याव्यात .. ज्यांना ताज्या आणि शिळ्यातला फरक कळतो त्यांनी रांगेत यावे “
(. . . संवाद सुरूच राहतो )

आता या साध्या संवादात कोणकोणती कार्ड्स खेळली गेली ते पाहू ::

कार्ड १ : “परोपकारी ” कार्ड ::: ” अहो रांग तिकडे मागून सुरु आहे .. तुम्हाला लक्षात आले नसेल म्हणून म्हटले सांगावं “
कार्ड २ : “निरागस ” कार्ड ::: “हो का? मला वाटलं कि इथूनच आहे ..
कार्ड ३ : “प्रसंगावधानी ” कार्ड :::: “तसे मला बाकरवाडीचे एकाच पाकीट घ्यायचे आहे .. नो प्रॉब्लेम .. हा घेईल माझ्यासाठी “
कार्ड ४ : “अन्यायाने पीडित कार्ड” ::: “अहो इथे सगळ्यांनाच एक पाकीट हवे आहे बाकरवाडीचे .. मागे रांगेत अनेक वयस्क उभे आहेत त्यांच्यावर हा अन्याय नाही का? “
कार्ड ५ : ” “समजूतदार ” कार्ड ::: “ठीक आहे .. मी थांबतो बाहेर ( असे म्हणत मित्राला सूचक इशारा) “
कार्ड ६ : “दूरदृष्टी कार्ड ” :::: ” तुमचे मित्र सुशिक्षित दिसतात .. मला खात्री आहे ते रांग मोडून तुमच्यासाठी बाकरवाडीचे पाकीट घेणार नाहीत “
कार्ड ७ : “कोल्हा कार्ड ” :: ” अहो तश्या मला नकोच आहेत .. चितळ्यांच्या बाकरवड्या बिग बास्केट ने घरी पण मागवता येतात .. सहज हा भेटला म्हणून म्हटले घ्याव्यात “
कार्ड ८ : “पत्ता कट ” कार्ड ::::: ” नाही , म्हणजे बिग बास्केट वर शिळ्या मिळतात ना.. काहींना चालतात त्यांनी अवश्य घ्याव्यात .. ज्यांना ताज्या आणि शिळ्यातला फरक कळतो त्यांनी रांगेत यावे “

वेगवेगळ्या प्रसंगात अशी अनेक कार्ड्स खेळली जातात . .. अस्त्रांप्रमाणे वापरली जातात .. पुण्यात तर वाक्यागणिक नवे कार्ड असते .

तुम्ही वर्तमानपत्र वाचून पहा अथवा कोणताही टीव्ही चॅनेल लावून पहा ..महिला, पुरुष, शिकलेला , गरीब , शेतकरी, खेड्यातला अशी कार्ड्स तर हुकुमी एक्के आहेत .. तुम्ही नीट पहिले तर तुम्हाला सर्व घटनात लपलेली कार्ड्स दिसतील आणि पत्त्यांचे शिक्षण शालेय अभ्यासक्रमात कसे आवश्यक आहे हे हि पटेल … !!

Leave a Reply

Your email address will not be published.